सिग्नलवर मागत होती भीक : काळेवाडीतील धक्कादायक प्रकार
पिंपरी – सिग्नलवर भीक मागणाऱ्या एका महिलेकडे तब्बल अकरा लहान मुले आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 18) काळेवाडी येथे उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील तापकीर चौक सिग्नलजवळ वेगवेगळया वयोगटातील अकरा मुले भीक मागत होती. नगरसेवक अभिषेक बारणे यांना याबाबत संशय आला.
त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता एका भीक मागणाऱ्या महिलेने ही सर्व मुले आणली असून तिची व तिच्या मोठ्या बहिणीची असल्याचे सांगितले. त्यांचे पती सांभाळ करीत नसल्याचेही त्यांना सांगितले. मात्र, बारणे यांना प्रथमदर्शनी मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे वाटत असल्याने त्यांनी मुलांना घेऊन थेट वाकड पोलीस ठाणे गाठले.
वाकड पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, मुले देखील पोलिसांच्या प्रश्नावर एकसारखी उत्तरे देत असल्याने त्यांना प्रशिक्षण दिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.