नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास जिल्ह्यातील आशा सेविकांनी विरोध दर्शवून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवशीय काम बंद आंदोलन केले. नगर जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करुन विविध मागण्यांचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले.
संघटनेच्या कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, जिल्हा सचिव ऍड. सुधीर टोकेकर, कोमल कासार, रुपाली बनसोडे, विजया लंके, अंबादास दौंड, सुनंदा भोसले यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या आशासेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्व्हेक्षणाकरीता आशा सेविकांवर सरकारने मोठी जबाबदारी टाकली आहे. आशा सेविका व गटप्रवर्तक यांना ही जबाबदारी मान्य नाही.
त्यामुळे आयटक संघटनेतर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी प्रतिरोध दिवस पाळण्यात आल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मधील दोन्हीही दिलेली कामे एकाच वेळी पार पाडली जाऊ शकत नाहीत. अशा फक्त सर्वे करतील.
त्यांच्यावर डाटा भरण्याची सक्ती करू नये. सर्वे करताना इतर कामे शिथिल करावीत. दररोज 300 रुपये भत्ता देण्यात यावा, जुलै 2020 पासूनची आशांना 2 हजार रुपये व गटप्रवर्तक यांना 3 हजार रुपये 1 ते 10 ऑक्टोंबरच्या पगारात फरकासह देण्यात यावे, जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत सर्वे केला जाणार नाही, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी निवेदन स्वीकारले.