सिंगापुर – पुढील दोन महिन्यात सिंगापुरात ओमायक्रॉनचाच पुर्ण प्रभाव असेल अशी शक्यता तेथील आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या देशात डेल्टा विषाणुचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही त्याची जागा ओमायक्रॉन विषाणुकडूनच व्यापली जाईल. सध्या तरी या देशात ओमायक्रॉनचा प्रसार मर्यादित स्वरूपात आहे.
काल तेथे दिवसभरात या विषाणुच्या 438 केसेस आढळून आल्या आहेत. विषाणुजन्य रोगांचे तज्ज्ञ प्रा डेल फिशर यांनी सांगितले की, हा रोग सौम्य स्वरूपाचा असला तरी येत्या दोन महिन्यात तो संपुर्ण देश व्यापून टाकण्याची शक्यता आहे. या रोगाच्या प्रादुर्भावाचे आव्हान समोर असताना आता त्याच्या नियंत्रणासाठी सिंगापुर सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
रूग्णालय सेवांची क्षमता वाढवल्याखेरीज देशापुढे कोणताही पर्याय अशा स्थितीत असणार नाही. सध्या करोनाच्या ज्या सक्रिय केसेस सिंगापुरात आहेत त्यातील 17 टक्के केसेस ओमायक्रॉनच्या आहेत.