देहूगाव (प्रतिनिधी) – तीर्थक्षेत्र देहू परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढतच असून ग्रामस्थांच्या मागणीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष बैठक घेत बुधवार (ता.8)पासून चौदा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, सरपंच पुनम काळोखे, उपसरपंच स्वप्नील काळोखे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष येडे, पोलीस पाटील सुभाष चव्हाण यासह सदस्य उपस्थित होते.
देहू परिसरात मंगळवार अखेर करोना बाधित रुग्णांची संख्या 37 वर पोहचली असून वेगवेगळया 12 ठिकाणी कंटेनमेन्ट झोन झाले आहेत. त्यामुळे करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व चर्चा होऊन नियोजन करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीची सोमवारी (ता.६) बैठक घेतली.
रुग्णालय, शासकीय कार्यालय वगळता मेडिकल दूध विक्री यांना मर्यादित वेळेत सुरु ठेवण्याचे तर
पाण्याचे एटीएम बंद ठेल्याने आरो फिल्टर पाण्याचे वाहने सुरू ठेवत सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार ८ तारखेपासून पुढील 14 दिवस (21 पर्यंत) संपूर्ण देहू लॉकडाऊन (जनता कर्फ्यु) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी 60 वर्षावरील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. दमा, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींनी त्याची माहिती डॉक्टरांना कळवावे. मॉर्निंग वॉक व शतपावली करणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. मास्क न वापरणारे, सार्वजनिक रस्त्यावर थुंकणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारासह इतरांंवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मेडिकल दुकान : सकाळी 10 ते 2, सायं.5 ते 10
दूध विक्री : सकाळी 6 ते 9 वेळेत सुरु राहतील