कराड -पश्चिम सुपने ता. कराड येथे उसाच्या शेतात आज मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. दीड ते दोन महिन्यापूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून शवविच्छेदनानतंर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चिम सुपने येथे सोमवारी दुपारी दीड वाजता जोमलिंग फाट्याजवळील थोरात मळ्यात शेतकरी अशोक थोरात यांच्या मालकीच्या ऊसाची तोडणी सुरू होती.यावेळी ऊस तोडणी कामगारांना सरी मध्ये एक मृत बिबट्या आढळून आला.
सबंधित घटनेची माहिती येथिल वनविभागास व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना देण्यात आली. घटनास्थळी तत्काळ वनरक्षक अशोक मलप व इतर वनमजूर दाखल झाल्यानतंर परिसराचे निरीक्षण केले असता बिबट्याचे मृत्यू होऊन साधारण दिड ते दोन महिने झाले असावे असे प्रथम दर्शनी दिसून आले. घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे मृतदेहाचे कराड येथिल वनविभागाच्या कार्यालयात पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय हिंगमीरे यांनी शवविच्छेदन केले.शवविच्छेदन करताना मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव गुन्हा नियंत्रण चे सदस्य रोहन भाटे यांनी काही घातपात आहे का नाही, ह्या दृष्टीने पाहणी केली. मात्र तसे काही आढळले नाही.
दरम्यान, मृत बिबट्याचे सर्व अवयव मिश्या,सर्व नखे, दात हे सुस्थितीत असल्याचे दिसून आले. मृत बिबट्या ही मादी होती व संपूर्ण वाढ झालेली होती, तिचे अंदाजे वय हे तीन वर्ष असल्याचे रोहन भाटे यांनी सांगितले.तसेच बिबट्याच्या शरीरावर कोठेही जखमांचे व्रण नसल्याचे दिसून आले.