सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले व वाई विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मदन भोसले यांच्या प्रचारार्थ सौ. दमयंतीराजे भोसले यांनी महिला कार्यकर्त्यांसमवेत लिंब (ता. सातारा), भुईंज, गुळुंब (ता. वाई) व खंडाळा या ठिकाणी काढलेल्या दौऱ्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लिंब येथे झालेल्या प्रचार सभेस कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले उपस्थित होत्या. वाई तालुक्यात भुईंज, गुळुंब आणि खंडाळा येथेही सौ. दमयंतीराजे व महिला कार्यकर्त्यांनी प्रचार सभा घेतल्या. या दौऱ्यात भाजपच्या सौ. नीता केळकर, सौ. सुवर्णा पाटील, सौ. चित्रलेखा माने-कदम, सौ. नीलिमा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन सौ. दमयंतीराजे यांनी या सभांमध्ये केले.
उदयनराजेंना सलग चौथ्यांदा लोकसभेत पाठविण्यासाठी जनता जनार्दनाने केलेला निश्चय प्रत्यक्षात आणताना विधासभेच्या उमेदवारांनाही पाठबळ द्यावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासगंगा प्रवाही होईल, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, लिंब येथील सभेत वेदांतिकाराजे म्हणाल्या, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व महिलांच्या सन्मानासाठी युती सरकारने विशेष योजना राबविल्या आहेत. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांना संधी द्या. भुईंज येथे शिवकन्या राणूअक्का जाधवराव यांच्या ऐतिहासिक वाड्यात झालेल्या मेळाव्यातही उपस्थित महिलांनी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.