मार्केट यार्डात इजिप्तचा कांदा दाखल

पुणे – दुष्काळ, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी, कांदा महागला आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने बाहेरील देशांतून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी (दि. 18) पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये इजिप्तचा सुमारे 50 टन कांदा दाखल झाला.

महाराष्ट्रामध्ये दीड महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव किरकोळ बाजारात तब्बल 60 ते 65 रुपये किलोच्या घरात जाऊन पोहोचले होते. दोन-तीन वर्षांनंतर कांद्याला चांगले भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, सर्वसामान्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे बाहेरच्या देशांतून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाने इजिप्तसह अन्य देशांतून कांद्याची आयात सुरू केली आहे.

शासनाने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकसह राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याची टिमकी विरोधकांनी उचलून धरली, परंतु गेल्या 15 दिवसांत स्थानिक आणि कर्नाटक राज्यातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याचे भाव पुन्हा खाली आले. सध्या चांगल्या प्रतिच्या कांद्याला घाऊक बाजरात प्रति किलोस 20 ते 25 रुपये किलो भाव मिळत आहेत. वाढलेले भाव नियंत्रित करण्यासाठी कांद्याची आयात करण्यात आली खरी, परंतु आयात केलेला कांदा दीड महिना उशिरा बाजारामध्ये दाखल झाला आहे. स्थानिक बाजारात भाव उतरल्यानंतर हा कांदा आल्याने ते आणखी पडण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

कांद्याकडे पुणेकरांची पाठ
मार्केट यार्डमध्ये इजिप्तच्या कांद्याची आवक झाली असली तरी पुणेकरांनी या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. हा कांदा आकाराने मोठा आणि आतून पोकळ असतो. यामुळे घरगुती ग्राहकांकडून फारशी मागणी नसते. केवळ हॉटेल आणि खानावळ व्यावसायिकांकडूनच इजिप्तचा कांदा खरेदी केला जातो. मागणी कमी असल्याने या कांद्याला केवळ 16 ते 20 रुपये किलो असे भाव मिळत असल्याचे कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

मार्केट यार्डात शुक्रवारी (दि. 18) इजिप्त येथून दोन कंटेनरमध्ये सुमारे 50 टन कांद्याची आवक झाली. सध्या मार्केट यार्डमधील कांदा-बटाटा बाजारामध्ये सुमारे 130 ट्रक स्थानिक कांद्याची आवक झाली. आवक वाढल्याने गेल्या काही दिवसांत भाव खाली आले आहेत.
– रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी

Leave A Reply

Your email address will not be published.