शिवेंद्रसिंहराजे भोसले; जावळीतील प्रत्येक गावाचा कायापालट करणार
सातारा – मी कोणत्याही व्यक्तीच्या अथवा पक्षाच्या विरोधात नाही तर, मी वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. जावलीतील प्रत्येक गावात विकासकामे पोहोचली आहेत. विरोधात राहून हवा तसा विकास होणार नाही म्हणूनच मी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. फक्त मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या पाठिंब्यावर मी हे पाऊल उचलले आहे. हुमगांवकरानी मला कायम साथ दिली आहे.
काही दिवसांपूर्वी इथल्या भूमिपुत्राबद्दल हीन पातळीवर टीका करणाऱ्या, स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना हुमगांवकरानी धडा शिकवून जावळीच्या विकासाची कास धरावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कुडाळ गणातील सरताळे, सर्जापूर, कुडाळ, बामणोली, भिवडी, सोनगांव, खर्शी, हुमगांव आदी गावांना शिवेंद्रसिंहराजे यांनी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.
याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारार्थ गावोगावी रॅली काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला. त्याला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानंतर हुमगांव ता.जावली येथे प्रचारार्थ आयोजित सभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, माजी सभापती सुहासदादा गिरी, शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, युवानेते सौरभ शिंदे, रिपाईचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, ज्येष्ठ नेते सयाजी शिंदे, माजी उपसभापती रवी परामणे, जावली बॅंकेचे माजी चेअरमन योगेश गोळे, मच्छिंद्र मुळीक, अँड. शिवाजी मर्ढेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विश्वनाथ धनवडे, चंद्रसेन शिंदे, प्रशांत तरडे, सरपंच वीरेंद्र शिंदे, सौ.गीताताई लोखंडे, सौ जयश्री पवार, जितेंद्र शिंदे श्रीहरी गोळे, प्रकाश महामुलकर आदी उपस्थित होते.
हुमगांव गावाला राष्ट्रवादी विचारांची परंपरा आहे.
परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांच्या कल्याणासाठी मी वेगळी भूमिका घेऊन भाजप पक्षात प्रवेश केला आहे. सध्याचे राष्ट्रवादीचे उमेदवाराने एकही काम मार्गी न लावता लोकांना राजकीय आकसापोटी नुसती गाजरे दाखवत आहेत. सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलून किती दुट्टपीपणा करत आहेत, हे लोकांनीच जाणावे. जिल्हा परिषदेची सत्ता ही फक्त पवारांकडे ठेवून स्वार्थी राजकारण करत आहेत. भाऊसाहेब महाराज हे शरद पवार साहेबांचे जवळचे सहकारी होते. साहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून ते राष्ट्रवादीबरोबर निष्ठेने राहिले. परंतु ते मंत्री पदाचे दावेदार असताना देखील त्यांना डावलले गेले. राष्ट्रवादीत असताना मी प्रामाणिक काम करून योग्य भूमिका बजावली आहे. मला ही उमेदवारी उगळता 15 वर्षात राष्ट्रवादीने काय दिले, असा सवालही शिवेंद्रराजेंनी केला.
बुवासाहेब पिसाळ म्हणाले, विकासाचा दृष्टिकोन ठेवून या गटातील प्रलंबित विकासकामे करण्यासाठी आम्ही बाबाराजें बरोबर आहे. शिवेंद्रराजे यांच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी नेहमीच त्यांना झुकते माप दिले आहे. मुख्यमंत्री फंडातून भरीव निधी मिळून हुमगांव-बावधन हा रस्ता शिवेंद्रराजे यांच्या प्रयत्नातून होणार आहे. तसेच महू-हातगेघर धरण,मेडिकल कॉलेज व नवीन मोठे उद्योग होणे गरजेचे असल्याने त्यांना सरकारची गरज आहे. शिवेंद्रराजे सत्तेच्या माध्यमातून गटातील विकासकामे करून भागाचे रुपडे पालटतील, असा मला ठाम विश्वास आहे.