मालाचा साठा करण्यासाठी विनाकारण धावपळ
मार्केट यार्ड – करोना संसर्गजन्य आजारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असून पुढील काळात किराणामाल मिळणे बंद होईल. या भितीने नागरिक भुसार बाजारातील दुकानांत गर्दी करीत आहेत. मार्केट यार्डातील किराणामालाच्या दुकानांतून गर्दी ओसंडून वाहत आहे. यातून करोना बाबत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून बाजार समितीसह आरोग्य प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारातील किराणा दुकानांतून ग्राहकांची गर्दी होत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांचा लागणारा किराणामाल व इतर घरगुती सामान खरेदी केले जात आहे. यातून मार्केट यार्डातील या विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून चारचाकी, दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
बाजारात करोना आजारापासून काळजी घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करत असून तसे फ्लेक्स लावलेले आहेत. भुसार बाजारात किराणा दुकानांबाहेर किरकोळ वस्तू खरेदीस मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्यास काळजी घेतली जाईल. त्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी लक्ष देतील. बाजारात स्वच्छता ठेवून सफाई करण्यात येत आहे.
– बी.जे.देशमुख, मुख्य प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती
मार्केट यार्ड भुसार बाजारात काही विशिष्ठ दुकानदारांना परवानगी नसतानाही अन्नधान्य शिवाय इतर वस्तूंची चुकीच्या पद्धतीने विक्री केली जात आहे. करोनाचा फैलाव रोखण्याकरिता काळजी घेणे गरजेचे असताना अशा दुकानांतील कामगारांकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.
– आनंद बाफना, अध्यक्ष, पर्वती विभाग व्यापारी संघटना