अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियाच्या संघाने आम्हाला रविचंद्रन अश्विनच्या ऑफ स्पीन गोलंदाजीची दहशत बसली आहे, असे वक्तव्य केले. लगेचच समीक्षक अश्विनचे कोतुक व ऑस्ट्रेलियाने त्याच्या गोलंदाजीच्या घेतलेल्या धसक्यावर आपापली मते मांडू लागले. पण मुळात प्रश्न हा आहे की ही खरीच दहशत आहे की ऑस्ट्रेलियाची कुप्रसिद्ध मीडिया स्ट्रॅटेजी. कारण हे असले उद्योग ते प्रत्येक देशाच्या दौऱ्यावर जातात तेव्हा करत असतात.
मागे एकदा त्यांनी झहीर खान, अनिल कुंबळे, हरभजनसिंग यांच्याबाबतही अशीच काहीशी विधाने केली होती व त्यावेळी हरभजनसिंग वगळता आपले सगळे गोलंदाज फारसे यश मिळवू शकले नव्हते. कारण त्यांना असेच वाटले होते की, ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या गोलंदाजीला घाबरला आहे. हे असे गैरसमज आपण नेहमी करतो, हा भाग वेगळा.
अश्विन त्यांच्याविरुद्ध सर्वात यशस्वी ठरला आहे, यात वाद नाही. त्याने त्यांच्याविरुद्ध खेळलेल्या एकूण 18 कसोटीत तब्बल 89 बळी मिळवले आहेत. त्याच्या जोडीला अक्सर पटेलनेही त्यांच्यावर नियंत्रण राखले होते. मात्र, भारतीय फिरकीच नव्हे तर जगभरातील फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर त्यांच्या स्टिव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, ऍश्टन ऍगरासारखे फलंदाज सातत्याने धावा केल्या आहेत. मग आत्ताच त्यांना अचानक अश्विनचे भूत कसे काय मानेवर बसले.
भारतातील खेळपट्टी ही पाटा असते हे त्यांना आयपीएल स्पर्धेत खेळत असल्यापासून किंवा त्यापूर्वी त्यांनी केलेल्या भारताच्या दौऱ्यापासूनच माहिती आहे, त्यात नवे काहीही नाही. मग आत्ताच त्यांच्या इयान हिलीला कसे तोंड फुटले याचा शोध घेतला पाहिजे. भारतीय संघाची दिशाभूल करत त्यांना बेसावध ठेवायचे व काटा काढायचा हा त्यांचा कुप्रसिद्ध हेतू आहे हे तर उघड दिसत आहे.
मात्र, भारताच्या एकाही खेळाडूने मनातल्या मनात मांडे खाऊ नयेत, अन्यथा दारुण पराभव स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. हा प्रयोग त्यांनी 2004 साली केला होता व तेव्हा त्यांनी भारतीय संघाला भारतातच पराभूत करत ऐतिहासिक कसोटी मालिका विजय साकार केला होता. त्यामुळे डोळ्यांवर कोणतीही झापड येऊ न देता जागे राहा, दिवास्वप्न पाहू नका. रोहित शर्मा आणि कंपनीला असेच सांगावेसे वाटते, रात्र नव्हे दिवस वैऱ्याचा आहे, त्यामुळे जागते रहो.