Supreme Court on NCP| अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने अजित पवार गटाला चांगलेच सुनावले.
काय म्हंटले सुप्रीम कोर्टाने ?
‘तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. शरद पवारांसोबत राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतला आहात. तर मग शरद पवारांचा फोटो तुम्ही प्रचारासाठी का वापरता? तुम्ही शरद पवारांचे नाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वापरणार नाही असं बिनशर्त हमीपत्र द्या’, अशा शब्दात सुप्रीम कोर्टात अजित पवार गटाला फटकारले आहे. येत्या सोमवारपर्यंत सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या पक्षाला हमीपत्र कोर्टात दाखल करण्याची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार आहे.
शरद पवार गटाच्या वकीलांचा युक्तिवाद
शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह अशाप्रकारे फोटो वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. याचा उपयोग ग्रामीण भागातील प्रचारासाठी होईल असं अजित पवारांच्या पक्षाचे नेते सांगत आहेत. लोकशाहीत निष्पक्ष निवडणूक झाली पाहिजे. शरद पवारांचा फोटो वापरू नका, तुमच्यात हिंमत असेल तर स्वत:च्या बळावर मते मिळवा. शरद पवारांचा फोटो वापरून मते का मागता? असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी केला. यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात शरद पवार गटाची बाजू मांडली.
NCP vs NCP | Supreme Court questions Ajit Pawar faction of NCP why it is using Sharad Pawar’s photo for campaigning.
Supreme Court tells Ajit Pawar faction, “You are a different political party now. You have chosen not to be with him. So why to use his (Sharad Pawar) picture…… pic.twitter.com/tIZnfdsNr9
— ANI (@ANI) March 14, 2024
यावर आमच्याकडून फोटो वापरण्यात येत नाहीत असं अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायाधीशांनी याला जबाबदार कोण? असा सवाल करत तुमच्या पक्षाकडून शरद पवारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फोटो आणि नाव वापरले जाणार नाही याबाबत हमीपत्र द्या, आता तुमच्या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. तुम्ही तुमच्या फोटोसह मतदारापर्यंत पोहचा, असंही न्यायाधीशांनी म्हटले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवारांच्या पक्षाकडून शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर केला जात होता. याबाबत शरद पवारांनीही ‘माझा फोटो वापरू नका’ असे स्पष्टपणे सांगितले होते. यावर आज सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे.
हेही वाचा: