पुणे – करोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांना घरी बसूनच उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळाने घेतला आहे.
करोनाचा प्रभाव वाढत चालल्याने शासनाने शाळा व महाविद्यालयाना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. नववी व अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार आहेत. दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षाही पुढे ढकलली आहे. शिक्षकांना “वर्क फ्रॉम होम’ची सवलत दिली आहे. मात्र, दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका शाळा व महाविद्यालयात जावूनच तपासणी करण्याचे बंधनकारक केले होते.
परंतु, महाराष्ट्रात जमावबंदीपाठोपाठ आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे आता शिक्षण विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कशा तपासणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर मंडळाने तोडगा काढला असून शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची व्यवस्था करून दिली आहे.