Chikkaballapura constituency loksabha election 2024 – कर्नाटकातील भाजपचे उमेदवार के. सुधाकर यांच्याविरुद्ध पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून ४ कोटी ८० लाख रूपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. चिक्कबल्लापुराच्या फ्लाइंग स्क्वॉड्सने ही कारवाई केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्याने एक्सवर ही माहिती दिली असून त्यांनी जप्त करण्यात आलेल्या रकमेचा आकडाही तिथे नमूद केला आहे. मदननायकनहल्ली पोलिस ठाण्यात भाजप उमेदवार के. सुधाकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
निवडणुकीत मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी रोकड, दारू किंवा अन्य भेट वस्तुंचा वापर केला जातो. तो रोखण्यासाठी आयोगातर्फे सर्वच ठिकाणच्या वाहनांची तपासणी केली जात आहे, त्यात त्यांना ही रोकड आढळून आली होती.