IPL 2024 : दहाव्या स्थानावरून पहिल्या चारमध्ये कशी पोहोचेल RCB..! जाणून घ्या, किती कठीण आहे ‘प्लेऑफ’चा मार्ग

IPL 2024, RCB Playoffs Qualify Chance : आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुसरा विजय नोंदवला. बेंगळुरूने हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 35 धावांनी पराभव केला. हैदराबाद या मोसमात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु बंगळुरूविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना संघानं निराशा केली. आता या दुसऱ्या विजयानंतरही आरसीबीला गुणतालिकेत कोणताही फायदा झाला नाही. संघ अजूनही दहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, संघ अद्याप पात्र होऊ शकतो की नाही हे जाणून घेऊया….
टॉप-4 मध्ये पोहोचून पात्रता मिळवणे आरसीबीसाठी आता सोपे राहिलेले नाही. बंगळुरूने या मोसमात 9 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 2 विजय मिळाले आहेत. अशा परिस्थितीत आता संघाला आणखी 5 सामने खेळायचे आहेत. बेंगळुरूने पुढील पाच सामने जिंकल्यास संघाचे एकूण 14 गुण होतील.मात्र, 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाणे फार कठीण आहे. संघाला किमान 16 गुणांची गरज आहे. गेल्या मोसमातही आरसीबीचे 14 गुण होते, पण त्यांना बाहेर पडावे लागले होते.
अशा प्रकारे RCB 14 गुणांसह ठरू शकते पात्र…
जर आरसीबीने उर्वरित सर्व सामने जिंकून 14 गुण मिळवले, तर सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी प्रत्येकी 14 गुणांसह स्पर्धा पूर्ण करावी अशी आशा संघाला करावी लागेल. या सर्व संघांचेही 14 गुण झाले तर आरसीबी चांगला धावगती साधून टॉप-4 मध्ये पोहोचू शकेल.
तथापि, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की जर आरसीबीने त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी एकही गमावला तर त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्य होईल. दुसरीकडे, हैदराबाद, लखनौ, चेन्नई, दिल्ली आणि गुजरात यापैकी कोणत्याही संघाला 16 गुण मिळाले तर आरसीबी थेट प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. आता आरसीबी या मोसमात पात्र ठरू शकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.





