corona vaccination; ‘या’ देशात १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला करोनाची लस

न्यूयॉर्क : जगभरात पुन्हा एकदा करोनाने हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तिथेही कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होत आहे. त्यातच करोनावरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबत घोषणा केली.

देशात १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला करोनाची लस घेता येईल असे बायडेन यांनी सांगितले. यापूर्वी, अमेरिकेने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला करोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी जो बायडेन यांनी १ मे ऐवजी १९ एप्रिलपासूनच १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला, असे सांगितले.

तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा गाठणारा आणि ६२ दशलक्ष लोकांचं पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दुसरीकडे, भारतातही वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. करोनाची लस 18 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना खुली करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) केली आहे. यासंदर्भात असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.