रेल्वे कॉलनीतील सर्व संशयित निगेटिव्ह
लोणावळा – लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील करोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आलेल्या एका होमगार्डचा करोना चाचणी अहवाल रविवारी (दि. 28) पॉझिटिव्ह आला आहे. तर त्याचवेळी शहरातील पोर्टरचाळ रेल्वे कॉलनीमधील करोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व संशयितांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे सदर पोलिसाच्या संपर्कात आलेल्या चार ते पाच जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यापैकी एका होमगार्डला लक्षणे दिसू लागल्याने त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी सकाळी त्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला असून, तो त्यात पॉझिटिव्ह आला आहे. सदर होमगार्ड हा डोंगरगाववाडी, डोंगरावर, लोणावळा येथील रहिवासी असून, कोविड केअर सेंटर, तळेगाव दाभाडे याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दुसरी बातमी लोणावळेकरांसाठी दिलासादायक आहे. शुक्रवारी लोणावळा शहरातील पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनीमधील एक महिला करोना पॉझिटिव्ह मिळून आली होती. सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व सातही व्यक्तींचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र खबरदारी म्हणून या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.