3 जुलै रोजी होणार निवड ः पद महिला प्रवर्गासाठी राखीव
जामखेड (प्रतिनिधी) – मागील पाच महिन्यांपासून रखडलेल्या जामखेड पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड प्रक्रिया 3 जुलै रोजी होणार आहे. सभापतिपद महिलेसाठी आरक्षित आहे. या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंचायत समिती सभागृहात राजश्री मोरे व मनीषा सुरवसे या दोघीच महिला सदस्या आहेत.
मागील पाच महिन्यांपासून रखडलेल्या जामखेड पंचायत समितीच्या सभापती निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी करीत निवडीचा कार्यक्रम घोषित केला. निवडप्रक्रिया 3 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापतिपदांच्या आगामी काळातील आरक्षणाची सोडत 12 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. सोडतीत जामखेड पंचायत समिती सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्चित झाले. मात्र, या पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले.
मात्र पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर देखील जामखेड पंचायत समिती सभापती निवडीसंदर्भात कोणतेही मार्गदर्शन प्रशासनास प्राप्त झाले नव्हते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रामविकास खात्याचे पत्र जिल्हा प्रशासनात प्राप्त झाले. त्यावर अनुसूचित जमाती वगळून अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. सोडतीत जामखेड सभापतिपद महिला प्रवर्गासाठी निघाले. मात्र, सभापतिपदासाठी निर्धारित मुदतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यानंतर निवडप्रक्रिया घेण्यात आली. त्यावेळी सभापतिपदासाठी राजश्री मोरे यांचा एकमेव अर्ज आला. मात्र जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी दाखला नसल्याने अर्ज माघारीच्या मुदतीत मोरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे सभापतिपद रिक्त राहिले. उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल करणाऱ्या मनीषा सुरवसेंची बिनविरोध निवड झाली. तेव्हापासून तब्बल पाच महिने जामखेड पंचायत समितीचे सभापतिपद रिक्त आहे. प्रभारी सूत्रे उपसभापती मनीषा सुरवसेंकडे आहेत.
या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंचायत समिती सभागृहात राजश्री मोरे व मनीषा सुरवसे या दोघीच महिला सदस्या आहेत. जामखेड पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्जतच्या प्रातांधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली असून, जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 माघार, तर दुपारी 3 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.