‘वायसीएम’मध्येच होणार करोना चाचणी

करोनासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके तयार करा – महापौर

पिंपरी – सध्या शहरात करोनाचा उद्रेक सुरू आहे. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत महापौर उषा (माई) ढोरे यांनी सांगितले की, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय कोरोना चाचणी यंत्रणा येत्या आठ दिवसांत सुरू केली जाणार आहे. करोना संशयित रुग्ण तपासणी व कंटन्मेंट झोन निश्चित करणे, कंटेनमेंट झोन रद्द करणे यासाठी क्षेत्रीय समितीनिहाय पथके तयार करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी महापौर ढोरे म्हणाल्या की, यामुळे 8 क्षेत्रीय कार्यालयानुसार कोरोना संदर्भात कामकाजाची विभागणी केल्यास वायसीएम रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका पदाधिकारी, गटनेते व अधिकार्यांची बैठक गुरूवारी (दि.25) पालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात झाली. त्या बैठकीत महापौरांनी वरील आदेश दिले.

बैठकीत उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक सागर आंगोळकर, तुषार कामठे, शशिकांत कदम, नगरसेविका शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. वर्षा डांगे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

शहरात सात कोविड सेंटर
बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून पालिकेच्या वतीने शहरात 7 ठिकाणी कोविड केयर सेंटर व 4 ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे. याशिवाय शासनाच्या निर्देशानुसार शहरातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड नियंत्रित करण्यात आले आहेत.

रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेणार
करोनावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी नव्याने संशयित रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी 8 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये 2 डेंन्टिस्ट, 2 संगणक ऑपरेटर, 1 परिचारिका व 1 मदतनीस असणार आहे. तसेच, 1 रुग्णवाहिका व कर्मचार्यांच्या प्रवासासाठी 1 वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बैठकीत गटनेते व उपस्थित नगरसेवकांनी सूचना मांडल्या. त्यावर योग्य तो विचारविनिमय करुन त्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महापौर ढोरे व पक्षनेते ढाके यांनी प्रशासनास दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.