लोकांच्या तक्रारी; सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्रात राजरोस लूट
कामेरी (प्रतिनिधी)- अवैध गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या अपशिंगे मंडळांमध्ये नेहमीच गौण खनिजाची लूट होते. याचा प्रत्यक्ष अनुभव माजगाव (ता. सातारा) येथील जनतेला आला. येथील एका विकास कामासाठी सामाजिक वनीकरणाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम रातोरात गायब झाला आहे. या मुरमाची लूट अपशिंगे मंडलातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू असल्याची चर्चा येथील लोकांमध्ये आहे.
शेकडो ब्रास मुरमाचे उत्खनन राजरोसपणे होत असून यावर प्रशासनाचे एवढी डोळेझाक का, असा सवाल येथील जनतेतून होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की माजगाव येथील तरवडीच्या माळावर असलेल्या सार्वजनिक वनीकरणाच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन महसूल विभागाच्या मेहेरबानीने सुरू असल्याची चर्चा आहे. या गावांमध्ये विकास कामाच्या नावावर हा मुरूम पळवला जात असून याचा विना रॉंयल्टी मुरमाचा वापर करून शासनाकडून दुहेरी लाभ घेतला जात आहे.
सार्वजनिक वनीकरणाच्या वृक्षारोपण केलेल्या जमिनीवर होत असलेली एवढ्या मोठ्या उत्खननावर ना वनविभागाचे लक्ष आहे ना महसूलचे. यामुळे शासनाचा महसूल बुडवला जात आहेच. परंतु, संबंधित विकास कामासाठी वापरलेल्या मुरमाचे पैसे शासनाकडून लीलया खिशात घालण्याचे काम जोमात सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सखोल चौकशी करावी आणि अशा अवैध प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. विशेष म्हणजे या वनीकरणाच्या जमिनीवर वृक्षारोपण झाले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून खर्च झाला असून याच ठिकाणी हे अवैध उत्खनन झाल्याचे दिसत आहे.
अपशिंगे मंडलातील अनेक गावांत काही दिवसांपासून मुरूम व इतर गौणखनिजाचा अनधिकृत उपसा राजरोसपणे सुरू आहे आणि हे सर्व माहित असताना अपशिंगे विभागातील मंडलाधिकारी, तलाठी याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत. अनाधिकृत गोष्टीकडे ते सोयीस्कर कानाडोळा करत असल्याने तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी अपशिंगे मंडलातील महसूल कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत तातडीने लक्ष घालत गौण खनिजाच्या लुटीची माहिती घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी विभागातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.