पिंपरी,(प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जन्म मृत्यूंच्या दाखले देण्याचे काम रखडले होते. परिणामी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. तसेच या विभागाच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महापालिकेच्या या ढिसाळ नियोजनाबाबत नागरिकांकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये जन्म आणि मृत्यू झाल्यास त्याची नोंद वायसीएम रुग्णालयातील जन्म – मृत्यू विभागात करण्यात येते. त्यामुळे जन्म – मृत्यूचा दाखला मिळवणे नागरिकांना अनिवार्य आहे. हा दाखला नसेल, तर नागरिकांची अनेक कामे अडून राहतात. अर्ज करूनही त्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेकडो नागरिकांना जन्म आणि मृत्यूचा दाखला वेळेत मिळालेला नाही. सर्व्हर डाउन झाल्याने हा विभाग बंद असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. नागरिकांना सांगितलेल्या वेळेत दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दाखल्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर जन्म किंवा मृत्यूचा दाखला मिळणे आवश्यक असते. मात्र, नागरिकांना चार ते पाच दिवस हेलपाटे घालावे लागत आहे.
२०१५ पुर्वीच्या दाखल्यांसाठी होतोय विलंब –
महापालिकेकडे जन्म-मृत्यूच्या काही जुन्या नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. नोंदीचे रेकॉर्ड पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे नागरिक सांगत आहेत. दाखला मिळविण्यासाठी करण्यात येणारा अर्ज हा नियमानुसार जन्म- मृत्यू विभागाकडून योग्य त्या फाॅरमॅटमध्ये मिळणे आवश्यक असते. मात्र, या विभागाकडून तो अर्ज मिळत नाही. कधी तो अर्ज मिळाला. तर नागरिकांना अर्ज लिहून आणण्याची सक्ती केली जात आहे. तर रेकाॅर्ड तपासून दाखले दिले जात असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेचा सर्व्हर डाऊन झालेला असल्याने दाखले देता आले नाहीत. त्यामुळे काही काळ ही अडचण निर्माण झाली होती. सध्या ही समस्या दुर झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना दाखल्याचे वाटप नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले आहे.