पिंपरी – “करोना’ हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
करोनाच्या संशयितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी घेतली जात आहे. करोना हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालयात उपाययोजना केल्या जात आहे. बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या वेळेत स्वाक्षरी करावयाची आहे.
सर्व आहारण-वितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली हजेरी पत्रकाची नियमितपणे तपासणी करावयाची आहे. फिरतीचे कामकाज असलेल्या कर्मचाऱ्यांनी फिरती रजिस्टरला नोंदी कराव्यात. त्याची तपासणी आहारण-वितरण अधिकारी, विभागप्रमुखांनी करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.