अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादा म्हणून केला जात आहे. त्यावर जोरदार प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदींना शहेनशाह अशी उपाधी दिली.
मोदींचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका यांची सभा झाली. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या भावाला शहजादा म्हटले जाते. त्या शहजाद्याने कन्याकुमारी ते काश्मीर असा ४ हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला.
शेतकरी, कामगारांसह माझ्या अनेक बंधू-भगिनींना ते भेटले. त्यांची गाऱ्हाणी ऐकली. समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली. त्याउलट, शहेनशाह असणारे मोदी महालात राहतात.
त्यांना टीव्हीवर पाहता ना? धुळीचा एकही डाग नसलेले स्वच्छ कपडे ते परिधान करतात. त्यांच्या डोक्यावरील एक केसही इकडचा तिकडे होत नाही. तुम्हाला करावी लागत असलेली मेहनत, तुमच्या समस्या, तुमच्यावरील महागाईचा बोजा त्यांना काय समजणार, अशी विचारणा त्यांनी उपस्थितांना उद्देशून केली.
गुजरातच्या जनतेशी मोदींचा संबंध राहिला नसल्याची टीकाही प्रियंका यांनी केली. सत्तेसाठी मोदींनी गुजरातच्या जनतेचा वापर केला आणि त्यांना विसरले, असे म्हणत त्यांनी मोदी गुजरातमधून निवडणूक लढवत नसल्याकडे लक्ष वेधले. उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून मोदी निवडणूक लढवत आहेत. त्याचा संदर्भ घेऊन प्रियंका यांनी मोदींना लक्ष्य केले.