सिमला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) हिमाचल प्रदेशच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी सिमला येथे दाखल झाल्या. राज्यपाल शिव प्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कल्याणी हेलिपॅड, छाब्रा येथे त्यांचे स्वागत केले.
उन्हाळ्याच्या हंगामात राष्ट्रपतींनी हिमाचलात राहण्याचा रिवाज आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती सिमल्यापासून १४ किमी अंतरावर असलेल्या मशोब्राजवळील प्रेसिडेंट रिट्रीटमध्ये मुक्काम करतील.गेल्या वर्षी 20 एप्रिल रोजी अधिकृतपणे सामान्य जनतेसाठी खुले करण्यात आलेले हे रिट्रीट राष्ट्रपती सिमल्यात असेपर्यंत जनतेसाठी बंद राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिमलाचे जिल्हा दंडाधिकारी अनुपम कश्यप यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राष्ट्रपती ८ मे रोजी दिल्लीला रवाना होतील.या पाच दिवसांच्या दौऱ्यात त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.त्यात सिमला पाणलोट क्षेत्राच्या भेटीचा समावेश आहे.
७ मे रोजी, त्या संकट मोचन आणि तारा देवी मंदिरात पूजा करतील आणि मॉल रोडवर फेरफटका मारतील. ६ मे रोजी राष्ट्रपती धर्मशाला येथे हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.