उपमहापौर तुषार हिंगे यांचा इशारा; हॉकी पॉलिग्रासचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच हवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर धान्यचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडिमयमध्ये नवीन पॉलिग्रास बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे पॉलिग्रास आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियम व अटीनुसार बसविले जावे, अन्यथा काम करु दिले जाणार नाही, असा इशारा उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी दिला आहे. नियमानुसार काम झाल्यास या मैदानावर भविष्यात आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
उपमहापौर हिंगे यांनी या मैदानाची पाहणी केली. या वेळी क्रीडा समितीचे सहायक आयुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, या कामाचे सल्लागार, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे व अधिकारी उपस्थित होते. पाहणीनंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरील सूचना केल्या. मैदानातील जुने पॉलिग्रास खराब झाले असून, त्या ऐवजी नवे पॉलिग्रास टाकण्याचे काम नुकतेच स्थापत्य विभागामार्फत सुरू झाले आहे. या कामाचा खर्च सुमारे 4 कोटी 14 लाख 95 हजार इतका होणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियमानुसार नवीन पॉलिग्रास टाकले जावे. त्यानुसार काम केले जावे. अन्यथा काम करू दिले जाणार नाही, असा इशारा हिंगे यांनी दिला आहे. स्थापत्य विभागाने कोणतेही काम करताना क्रीडा विभागाशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घेऊनच काम करावे. त्यामुळे नागरिकांचा पैसा वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.
…तर क्रीडा विभागाच बंद करा – तुषार हिंगे
पॉलिग्रास लावण्याचे काम करताना क्रीडा विभागाशी स्थापत्य विभागाने कोणताही समन्वय ठेवला नाही. क्रीडा विभागास विश्वासात न घेता परस्पर हे काम सुरू केले आहे. त्यामुळे क्रीडा विभागाच बंद करून टाका, अशी प्रतिक्रिया तुषार हिंगे यांनी व्यक्त केली.