ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडातील अधिकाऱ्यांनी ३ भारतीयांना अटक केली आहे. निज्जरच्या हत्येचा तपास अद्याप संपलेला नसून या हत्येच्या कटामध्ये सामील असलेल्या आणखीन काही जणांना देखील अटक केली जाईल, असेही कॅनडाच्या तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Canadian authorities arrest three Indian nationals in connection with Nijjar’s murder, say more involved in case)
करण ब्रार (वय २२) , कमलप्रीत सिंग (वय २२) आणि करणप्रीत सिंग (वय २८ वर्षे) अशी अटक केलेल्यांची नावे असून हे तिघेही एडमोन्टन भागात रहाणारे भारतीय नागरिक आहेत. त्यांच्यावर प्रथम श्रेणी हत्या करणे आणि हत्येचा कट करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कॅनडाचा नागरिक असलेल्या निज्जरच्या या हत्येच्या कटामध्ये भारत सरकारचा सहभाग होता का, याचा तपास केला जात असल्याचे रॉयल कॅनडियन माऊंटेड पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या तिघांवर भारत सरकारच्यावतीने निज्जरच्या हत्येची कामगिरी सोपवण्यात आली होती, असे समजले जाते आहे. या हत्येमध्ये आणखीन काही जणांचा सहभाग होता, हे आम्हाला माहीती आहे. त्या सर्वांना शोधून काढून अटक केली जाणार आहे, असे तपास पथकाचे प्रमुख मनदीप मूकर यांनी सांगितले.
अटक केलेल्या तिघांविरोधात काही पुरावे मिळाले आहेत. मात्र त्या पुराव्यांचे स्वरुप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच कॅनडामधील भारतविरोधी दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एखादा स्लीपर सेल कार्यरत आहे का, या प्रश्नाला देखील पोलिसांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने याबद्दल काहीच सांगता येऊ शकत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हरदीप सिंग निज्जर हा कॅनडात स्थायिक झालेला खलिस्तानी फुटिरवादी होता. त्याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. कॅनडातील सरे भागात ब्रिटीश कोलंबिया भागातल्या गुरुद्वाराबाहेर १८ जून २०२३ रोजी निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.