लंडन – जगभरामध्ये करोना विषाणू महासाथीला थोपवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरणानंतरही काही देशांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच ब्रिटनमधील मंगळवारच्या करोना मृत्यूंच्या आकडेवारीमुळे करोना संकट अद्याप सरलेलं नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यावर्षी मार्च महिन्यानंतर ब्रिटनमध्ये एका दिवसात नोंदवलेले हे सर्वाधिक मृत्यू ठरले आहेत.
ब्रिटनमध्ये १८ वर्षांवरील ७५ टक्के नागरिकांचे करोना लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ८९ टक्के नागरिकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना देखील मृत्यूंची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रिटनमध्ये विषाणूच्या डेल्टा अवतारामुळे नवं संकट उभं राहील असून नव्या बाधितांपैकी ९९ टक्के बाधितांना डेल्टा विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर येतंय.
सरकारी आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये मंगळवारी १४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह देशातील मृत्यूंची एकूण संख्या १ लाख ३० हजार ५०३ इतकी झाली आहे. गेल्या सात दिवसांत २८ दिवसांच्या आत कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूच्या प्रमाणात १४.८ टक्क्यांची वाढ देखील नोंदविण्यात आली आहे. मृत्यूंचा वाढता दर अधिकाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.