कामशेत – “ओला-उबेर’कडून मिळालेल्या प्रवाशांनी चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मोटार पळविली. बऊरगावच्या (ता. मावळ) हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगतीवर पंधरा दिवसांपूर्वी वाहनचालकांना धमकावून लुटमार करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा छडा लावण्यात कामशेत पोलिसांना यश आले. द्रुतगतीवर रात्रीचा प्रवास असुरक्षित होत असताना लुटमारीला परप्रांतीय कनेक्शन असल्याचे अधोरेखित झाले आहे.
मुलचंद उर्फ मनिष मुन्नासिंह (वय 22, रा. उत्तर प्रदेश), निखील सुरेंद्र शर्मा (वय 21, रा. अशोकनगर, सादरा) या दोघांना दिल्ली येथून शिताफीने अटक केली. तसेच सोरन बाबुराम सिंह (वय 25, रा. उत्तरप्रदेश) हा राजकोट गुजरात येथे असल्याबाबतची माहिली मिळाल्यावर त्याला राजकोट (गुजरात) येथे बेड्या ठोकल्या. विष्णू बब्रुवान येरंडे (वय 23, रा. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या टोळीतील एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक आरोपींना मंगळवारी (दि. 10) वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मोटार चालक प्रदीप परमेश्वर भोंगे (वय 22, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी (27 जुलै) रात्री 10 वाजता चालक प्रदीप भोंगे यांना “ओलाउबेर’कडून कॉलद्वारे म्हाळुंगे (चाकण) येथे वरील चार आरोपी प्रवासी म्हणून भेटले. चार प्रवाशांना घेऊन चालक भोंगे त्याच्या मोटारीने (एम. एच. 12 /एन.एक्स/0095) पनवेलच्या दिशेने निघाले. मोटार पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बउर गावच्या हद्दीत आली. त्यावेळी मोटारीमधील तीन व्यक्तींनी चालकास पिस्तुलाचा धाक दाखविला. चालक भोंगे यांना बेदम मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोटार पळवून नेली. या घटनेनंतर चालक भोंगे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात मोटार चोरीची तक्रार दिली.
पुणे-मुंबई द्रुतगतीवरील लुटमारीच्या घटनेची दखल घेत पोलिसांनी तपासाची सूत्र हलविली. भोंगे यांच्या तक्रारीवरून चोरटे मुंबईच्या दिशेने मोटार घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी आरोपींचा तांत्रिक तपास केला. त्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याचे माहिती पोलिसांच्या हाती लागली. तपासाकरिता पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस नाईक हनुमंत माने, मिथुन धेंडे, भिसे यांचे पथक जळगाव, ग्वाल्हेर येथे आरोपींचा शोध घेत दिल्लीपर्यंत पोहोचले. तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सोने विकण्याचा बहाणा केला. आणि आरोपींना पकडण्यासाठी दिल्लीत सापळा लावला.
दिल्ली पोलिसांच्या मदतीने कामशेत पोलिसांनी मुलचंद उर्फ मनिष मुन्ना सिंह, निखील सुरेंद्र शर्मा या दोघांना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. त्यानंतर तिसरा आरोपी सोरन सिंह हा राजकोट (गुजरात) येथे असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यास राजकोट येथून अटक केली. त्यानंतर चौथा आरोपी विष्णू येरंडे याला जेरबंद केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे, असल्याचे पोलिसांनी सांगितले.