नवी दिल्ली – करोना संसर्गाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरल्यानंतर केंद्र सरकार करोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. मात्र केरळमध्ये करोनाची स्थिती चिंताजनक होतोय. विशेष म्हणजे, लस घेतलेल्या ४० हजार लोकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळं तिसरी लाट सुरू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याच दरम्यान आलेल्या एका अहवालामुळे केंद्र सरकारसमोरील चिंता आणखी वाढली आहे. केरळमध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या 40 हजार लोकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ‘एनडीटीव्ही’ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
लस घेतल्यानंतरही वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे सरकार चिंतेत आहे. हा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रकोप आहे का ? किंवा प्रतिकारशक्ती नष्ट करणारा अन्य कोणता नवीन व्हेरिएंट तर सक्रिय झालेला नाहीय ना? याची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारने रुग्णांची माहिती आणि सँपल मागवले आहे.
केरळमध्ये बुधवारी नवीन करोना रुग्णांचा आकडा 21 हजार 119 वर पोहोचला, तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला.