नवी दिल्ली – राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी कॉंग्रेसने 12 जुलैला दिवसभराचा मौन सत्त्याग्रह धरण्याचे ठरवले आहे. देशातील सर्व राज्य मुख्यालयांमध्ये हा सत्त्याग्रह केला जाणार आहे.
राहुल गांधी यांना एका बदनामीच्या खटल्यात गुजरात हायकोर्टाने कोणताहीं दिलासा देण्यास काल नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे एकटे नाहीत, देशातील कॉंग्रेसचा लाखो कार्यकर्ते त्यांच्या समवेत आहेत हे दर्शवून देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी हा सत्त्याग्रह आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली.
त्यांनी तसे पत्र देशातील सर्व प्रदेशाध्यक्षांना पाठवले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, या सत्त्याग्रहात पक्षाचे वरीष्ठ नेते, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत हा सत्त्याग्रह होणार आहे.
दरम्यान मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका सभेत जे विधान केले होते, त्यावरून त्यांना गुजरात मधील स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. या प्रकरणी त्यांनी कोणताहीं दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टानेही नकार दिला आहे, त्यामुळे त्या संबंधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची भूमिका कॉंग्रेसने या आधीच घेतली आहे.