अहमदाबाद : गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. त्या राज्यातील विधानसभेत सत्तारूढ भाजपकडे असणारे प्रचंड बहुमत हे त्यामागील कारण आहे.
गुजरातमधून राज्यसभेवर 11 सदस्य पाठवले जातात. सध्या त्यातील 8 सदस्य भाजपचे, तर 3 सदस्य कॉंग्रेसचे आहेत. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याबरोबरच जुगलजी ठाकोर आणि दिनेश अनावाडीया या भाजपच्या सदस्यांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला समाप्त होणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 3 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपकडून दिले जाणारे तिन्ही उमेदवार आरामात विजयी होतील. त्यामुळे त्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे.
गुजरातमध्ये मागील वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भाजपने त्या राज्यातील प्रदीर्घ सत्ता राखली. विधानसभेच्या एकूण 182 पैकी तब्बल 156 जागा भाजपने खिशात घातल्या. त्या पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले.