शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीचा ऐतिहासिक विजय

भाजपचे पाचर्णे यांचा 41 हजार मतांनी पराभव : १९६२ नंतरचा सर्वात मोठा कौल

शिरूर – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार बाबूराव पाचर्णे यांचा 41 हजार 504 मतांनी पराभव करून शिरूर-हवेली तालुक्‍यात ऐतिहासिक विजय मिळवला. 1962 पासून शिरूर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या विजयाचे किंगमेकर म्हणून त्यांची पत्नी सुजाता पवार यांनी काम केले आहे.

शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत तीन नंबरचा पक्ष वंचित आघाडी ठरला आहे. त्यांचे उमेदवार चंदन सोंडेकर यांना तीन नंबरची मते मिळाली आहे. तर मनसेचे कैलास नरके हे चौथ्या क्रमाकांवर फेकले गेले. या निवडणुकीत 1 हजार 819 मतदारांनी नोटाला पसंती दिली.शिरूर येथील कुकडी वसाहतीमध्ये सकाळी आठपासून मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे व सहायक निवडणूक अधिकारी लैला शेख याच्या मार्गदर्शनखाली सुरू झाली. पहिल्या तीन फेऱ्या भाजपाचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या पंचक्रोशी व शिरूर शहरातील बालेकिल्ल्यातून सुरू झाल्या. पहिल्या फेरीतच राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी पाच मताची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी अशोक पवार यांनी वाढवत नेली. सोलापूर रोडपर्यंत जवळपास शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी चाळीस हजारांपर्यंत गेली.

माझा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. मतदारसंघातील प्रस्थापित सर्वच पुढारी माझ्या विरोधात गेले होते. परंतु सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली.त्यामुळेच माझा विजय झाला आहे. याचे सर्व श्रेय सर्वसामान्य मतदार, स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना आहे.
– ऍड. अशोक पवार, विजयी आमदार, शिरूर-हवेली

पोस्टल मतदानात पवार आघाडीवर – 
पोस्टल मतदानात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक पवार यांना 393 मते तर भाजपा आमदार बाबूराव पाचर्णे यांना 257 मते मिळाली. सर्व फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना 1 लाख 45 हजार 131 मते मिळाली. भाजपा उमेदवार बाबुराव पाचर्णे 1लाख 3 हजार 627, वंचित आघाडीचे उमेदवार चंदन सोंडेकर यांना 3 हजार 140, मनसेचे कैलास नरके यांना 1 हजार 926, बहुजन समाज पक्षाचे रघुनाथ भिवार यांना 907, अमोल लोंढे यांना 741, चंद्रशेखर घाडगे यांना 177, नरेंद्र वाघमारे यांना 618, नितीन पवार यांना 332, सुधीर पुंगलीया यांना 235 इतकी मते मिळाली. तसेच या निवडणुकीत 1 हजार 819 मते नोटाला मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.