श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली. जम्मू-काश्मीरमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळातील दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील ही पहिलीच चकमक होती.
पुलवामामधील फारसीपोरा भागात पोलीस आणि सुरक्षाबलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त शोधमोहिम राबवली. दरम्यान, सीआरपीएफचे जवान एका संदिग्ध गल्लीत तपास करत असतानाच दहशतवाद्यांनी सुरक्षाबलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षाबल आणि पोलिसांनीदेखील प्रतिहल्ला चढवला. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.
ठार केलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दानिश एजाज शेख (३४) असे या दहशतवाद्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तो मूळचा श्रीनगरमधील रहिवासी असून तो प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाशी संलग्न होता, असे प्रवक्त्याने सांगितले. या चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा आणि गुन्हेगारी साहित्य सापडले आहे.