पुणे – जिल्हा कॉंग्रेसच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष संजय जगताप, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुरंदर, इंदापूर विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. पुरंदरची जागा कॉंग्रेसच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीपासून पुरंदर तालुक्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी धर्म पाळला गेला आहे. त्यात जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी खासदार सुळे यांना मताधिक्क्य दिले आहे. त्याची परतफेड कॉंग्रेसच्या पदरात टाकली जाण्याचे संकेत आहेत. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आघाडीच्या जागा वाटपानंतर स्पष्ट होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या तालुक्यात परिवर्तनासाठी नागरिक नेहमीच सजग आहेत. या तालुक्यात शरद पवार यांना मानणारा गट सक्रिय आहे. 1999 पासून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तालुक्यातील मातब्बर नेते शरद पवार यांच्या छावणीत दाखल झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या तालुक्यातील नेत्यांना जिल्हापातळीवरील पदे देऊन पक्षसंघटना वाढविली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला 2009 पर्यंत होत होता.
2009 पासून पुरंदर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलत गेली. 1999 पासून आघाडी धर्माची पताका खांद्यावर घेणाऱ्या दोन्ही पक्ष्यांतील नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकोपा कमी होत गेला. त्यामुळे 2009 मधील विधानसभा निवडणुकीत जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे यांना राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना आखाड्यात उतरविले. यावेळी तालुक्यात मराठा आणि माळी यांच्यातील जातीचे कार्ड मोठ्या प्रमाणात चालले. त्याचा फटका दुर्गाडे यांना बसला. त्यामुळे पुरंदर तालुक्यात शिवसेनेचा बाण राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. त्यानंतर राष्ट्रवादीने पुन्हा बाळसे धरलेले नाही. त्यात राष्ट्रवादीची एकगठ्ठा मते हीच त्यांची जमेची बाजू ठरली. गेल्या दहा वर्षांत या तालुक्यावर शिवसेनेचा कारभारी आहे.
बेरजेचे राजकारण?
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर हा निर्णायक तालुका आहे. या तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुदामअप्पा इंगळे, विजयराव कोलते, विठ्ठलराव झेंडे, शिवाजी पोमण आदी मातब्बर नेते आहेत. तसेच तालुक्यात कॉंग्रेसचा गट प्रबळ आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांची स्वतंत्र व्होटबॅंक मजबूत आहे. जगताप यांची मते पुरंदर तालुक्याचा कौल बदलवू शकतात. त्याचे दूरगामी परिणाम हे 2009 मध्ये उमटले होते. त्यानंतर आघाडी धर्माचे पालन हे 2014 आणि 2019 मधील लोकसभेला झाले आहे. जगताप यांनी दोन्ही निवडणुकीत खासदार सुळे यांना केलेली मदत राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसला झुकते माप देणार काय, याची उत्सुकता आहे. पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा गट एकदिलाने एकत्र आल्याशिवाय शिवसेनेला टक्कर देऊ शकणार नाही, याची खात्री हायकमांडला आहे. त्यामुळे आघाडी धर्मात बेरजेचे राजकारण निर्णायक ठरणार आहे.