पुणे – साने गुरुजी तरुण मंडळ यंदा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती 100 फूट लांब, 40 फूट रुंद आणि 60 फूट उंच असणार आहे, अशी माहिती साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.
दरवर्षी वैविध्यपूर्ण देखावे करणाऱ्या साने गुरुजी तरुण मंडळाने 81 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. श्रीराम मंदिरासाठी खड्डेविरहित मांडव उभारण्यात आला असून, मंदिराचा बहुतांश भाग हा लाकडापासून तयार करण्यात आला आहे. आवश्यक तिथेच फायबरचा वापर करण्यात आला आहे.
श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईंच्या मूर्ती तसेच वेगवेगळ्या फ्रेम्स या गोष्टी मंदिरात असतील. श्रीराम मंदिराच्या बाहेर प्रभू श्रीरामांची मूर्ती उभारण्यात येणार आहे. मुंबईतील कलाकार मिथिलेशकुमार आणि त्यांचे बंधू नीतेशकुमार श्राप हे याचे कलाकार आहेत. गणेशोत्सवानिमित्त काही उपक्रमांचेही मंडळातर्फे आयोजन करण्यात आले आहे.
भिडे गुरुजी यांच्या हस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठा
सोमवारी सायंकाळी सहा वाजता साने गुरुजी नगर येथे शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या हस्ते साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तर हैदराबादचे हिंदुत्ववादी आमदार गोरक्षक टायगर राजासिंह ठाकूर ऊर्फ राजाभैय्या यांच्या हस्ते श्रीराममंदिर देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.