पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराची वाट स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी सुशोभिकरण सुरू आहे. रस्ते डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामे सुरू आहेत. त्यात झाडांच्या बुंध्यांजवळ सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आले असून त्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. किमान झाडांना तरी मोकळा श्वास घेऊ द्या, अशी भावना पर्यावरण प्रेमींची असून झाडे जगली नाही तर, शहराच्या प्रदूषणात किती वाढ होईल, असा प्रश्न उभा रहात आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. त्याला विविध घटक कारणीभूत असतील. मात्र, शहरातील अवैधरित्या होत असलेली वृक्षतोडही कारणीभूत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड होत आहे. परिणामी त्या-त्या परिसरातील प्रदूषणात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातून अनेकांना व्याधी जडण्याची शक्यता आहे. शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. मात्र, वृक्षतोड होत राहिल्यास ऑक्सिजन कसा मिळणार असा प्रश्न आहे. शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीसंदर्भात वारंवार वृक्षप्रेमींना आवज उठविला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत तसेच कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही.
शहरात प्रत्येक वर्षी पावसाळ्यास लाखोंच्या संख्येने रोपे लावली जातात. काही वर्षांत ही रोपे मोठी होतात. मोठी होताच ती कोणतीही पूर्व सूचना न देता तोडली जातात. याकडे महापालिकेचा उद्यान विभाग, वृक्षप्राधिकरण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. अनेकदा तर, महापालिका कर्मचारीच ही अवैध वृक्षतोड करताना आढळून आली आहेत. मात्र, त्यावर कोणतीच ठोस उपायोजना होताना दिसत नाही. गेल्या वर्षी सुमारे 80 झाडे उन्मळून पडल्याची अग्निशमन विभागाकडे नोंद आहे. तर, यंदा पहिल्या तीन महिन्यातच 16 झाडे पडली होती.
झाडांची मुळे कुजतात
शहरात सध्या ठिकठिकाणी सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. शहरी हरीत मार्गदर्शक तत्वानुसार 1.25 चौरस मोकळी जागा झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी ठेवावी लागते. त्यामुळे झाडांना व्यवस्थित पाणी, हवा आणि ऑक्सिजन मिळते. मात्र, शहरात सर्वत्रच झाडांच्या बुंध्यांजवळ सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे झाडांना पाणी, ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी झाडांची मुळे कुजतात. झाडांची वाढ खुंटते आणि थोडी जरी हवा आली तरी झाडे उन्मळून पडतात.
येथे दिसतेय कॉंक्रिटीकरण
– इंद्रायणीनगर ते थरमॅक्स चौक
– भोसरी
– निगडी
– पिंपळे सौदागर
– वाकड
– चिंचवड
पिंपरी चिंचवड हे अवैध वृक्षतोडीचे माहेरघरच झाले आहे. पालिका कर्मचारी अवैध कृत्यात सामील आहेत, हे देखील स्पष्ट आहेच. उद्यान विभाग प्रमुख बघ्याच्या भूमिकेत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये जाणीवपूर्वक झाडे मारण्याचे नियोजनच सुरू आहे, की काय असे वाटायला लागले आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तांनी कारवाही न करण्याचा घेतलेला पवित्रा खेदजनक आहे. स्वतः वृक्षप्राधिकारण अध्यक्ष असून देखील वृक्षतोडीच्या परवानग्या, अवैध वृक्षतोडीवर कारवाही न करणे सुरू आहे, याचसाठी वृक्ष प्राधिकरण बनले आहे का?
– प्रशांत राऊळ, पर्यावरण प्रेमी