देर अल-बलाह (इस्रायल) – हमासने आज इस्रायलच्या मध्य भागात आणि राजधानी तेल-अविववर मोठ्या प्रमाणात रॉकेटचा मारा केला. यामुळे या परिसरात नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवले गेले.
सात महिन्यांपूर्वीच्या हल्ल्याच्यावेळी हमासने इस्रायलच्या वस्ती असलेल्या भागांमध्ये अशाप्रकारे रॉकेटचा मारा केला होता. त्यानंतर हमासकडून तेल-अविववर पहिल्यांदाच रॉकेटचा मारा करण्यात आला आहे.
गाझामधील काही ठिकाणांवर हमासने यापूर्वी रॉकेट डागली होती. मात्र लांब पल्ल्यांची रॉकेट यापूर्वी डागली गेलेली नव्हती.या रॉकेटमुळे नागरिकांना सतर्क करणारे सायरन वाजवले गेले आणि लोकांनी बचावासाठी भूमिगत बंकर आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
या रॉकेट हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही अथवा मालमत्तेची हानी झाल्याचे देखील समजलेले नाही. दरम्यान इस्रायलच्या दक्षिणेकडील भागातून मदतीच्या ट्रकनी गाझामध्ये प्रवेश केला.
रफाह शहराच्या बाजूची सीमा इस्रायली सैन्याने यापूर्वीच बंद करून टाकली आहे. इजिप्तनेही आपल्या बाजूने रफाह शहरात जाणारा मार्ग बंद केला आहे.
जोपर्यंत रफाह पर्यंत जाणाऱ्या मार्गाचा ताबा पुन्हा पॅलेस्टिनींकडे दिला जाणार नाही, तोपर्यंत ही सीमा बंदच राहिल, असे इजिप्तने म्हटले आहे. त्यामुळे आता मदतीच्या ट्रकसाठी इस्रायलने हा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.