पिंपरी – मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या अमानवी अत्याचाराच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या नग्न व्हिडिओने त्यात भर टाकली आहे. दोन्ही घटनांच्या निषेधार्त पिंपरी-चिंचवड महिला कॉंग्रेसने पिंपरी चौकात आज निदर्शने केली. सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून महिलांनी तीव्र निषेध केला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माजी नगरसेविका निगार बारस्कर, श्यामला सोनवणे, माजी प्रदेशाध्यक्ष महिला कॉंग्रेस कमिटी स्वाती शिंदे, आशा भोसले, सोनू दमवानी, निर्मला खैरे, रंजना सौदेकर, अर्चना रसाळ, मयुरी कांबळे, अभिमन्यू दहीतुले, हरीश डोळस, भाऊसाहेब मुकुटमल आदी आंदोलनात सहभागी होते.
देशात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. कॉंग्रेसकाळात महिला सुरक्षित होत्या. मात्र, भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. भाजपाचे किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ समोर आल्याने त्यात आणखी भर पडली आहे. भाजपाकडून एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला जातो. तर, दुसरीकडे भाजपाची सत्ता असलेल्या मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जाते. भाजपाचा नेताही महिलेला व्हिडिओ कॉलवरून अश्लील चाळे करतो, हे अत्यंत किळसवाने असून देशाच्या संस्कृतीला कलंकीत करणारे आहे. या व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. याठिकाणी अन्य पक्षाचे कोणी असते तर आतापर्यंत ते तुरुंगात असले असते, असा संताप व्यक्त करत सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारुन कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.