पिंपरी, (प्रतिनिधी) – बँकेत मूल्यांकन कर्ता म्हणून काम करणार्या व्यक्तीने 12 ग्राहकांकडून 41 लाख 99 हजार रुपये किमतीचे खोटे सोने तारण म्हणून ठेऊन घेतले. याप्रकरणी सोने गहाण ठेवणार्या 12 ग्राहकांसह मूल्यांकनकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 मार्च 2023 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दि बारामती सहकारी लिमिटेड बँकेच्या सांगवी शाखेत घडला.
दि बारामती सहकारी बँकेचे व्यवस्थापक विजय कदम यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 25) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश शरद जगताप (रा. हडपसर), प्रशांत शरद हेगडे (रा. नवी सांगवी), महेश सुदाम धुमाळ (रा. पिंपळे गुरव), गणेश किसन कोंगाळे (रा. सांगवी),
निखील राहुल म्हेत्रे (रा. नवी सांगवी), गणेश शरद बागडे, प्रांजल विजय जोशी (रा. नवी सांगवी), प्रसाद चंद्रकांत डहाळे (रा. नवी सांगवी), विठ्ठल बाबुराव राऊत, तीन महिला, मूल्यांकनकर्ता दीपक विठ्ठल शहाणे (वय 51, रा. नवी सांगवी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शहाणे यांच्यावर दि बारामती सहकारी बँकेच्या सोने तारण विभागाची मुल्यांकन कर्ता म्हणून महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांनी अन्य 12 लोकांशी संगनमत करून त्यांच्याकडून खोटे सोने बँकेत तारण ठेऊन घेतले. त्याबाबत खोटी कागदपत्रे बनवून बँकेकडून त्यांना 41 लाख 99 हजार रुपयांचे सोने तारण कर्ज देत बँकेची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.