पिंपरी, (प्रतिनिधी) – देहूगाव येथे वास्तव्यास असलेले सुभाष पाटील यांनी त्यांच्या घरी वाढवलेले वड पिंपळ कडुलिंब औदुंबर जांभूळ रान भेंडी सिताफळ अशी जवळपास एक हजार देशी रोपे वृक्षदाई संस्थेला भेट दिले. ते कामानिमित्त पंजाब येथे काही दिवस गेले असताना परततान त्यांनी जवळपास 300 पिंपळ वृक्ष विमानातून आणले होते, हे विशेष.
गेली अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही असलेले सुभाष पाटील हे आपल्या कृतीमधूनही निसर्गाची जपणूक करण्यावर भर देत आहेत. ते कामानिमित वेगवेगळ्या भागात जात असतात. अशावेळी रस्त्यावर किंवा कंपनीच्या पार्किंगमध्ये पक्षांच्या विष्ठेतून उगवलेले वड पिंपळ कडुलिंब औदुंबर असे वृक्ष तेथून काढून आणून घरच्या पार्किंगमध्ये पिशव्यांमध्ये लावून वर्षभर त्यांचा सांभाळ करत आहेत. तर रोपांची निगा राखण्यासाठी त्यांना त्यांची पत्नी प्रतिभा, बहिण वैष्णवी मुलगा शंभूराजे व शिवनंदन यांची मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे ते आवर्जुन सांगतात.
यावर्षी ते कामानिमित्त पंजाब येथे काही दिवस गेले होते. त्याठिकाणाहून परतताना त्यांनी जवळपास पिंपळाची 300 रोपे विमानातून आणली होती. एक ते दीड इंच उंचीची रोपे त्यांनी चार बाय पाचच्या पिशव्यांमध्ये लावून त्याचे चांगले संगोपन केले. आता ही रोपे एक ते दीड फूट उंचीपर्यंत वाढली आहेत. त्यांनीही सर्व रोपे वृक्षदाई संस्थेचे अध्यक्ष हभप शिवाजी महाराज मोरे यांच्याकडे सुपुर्द केली.
ही रोेपे हस्तांरित करण्याचा कार्यक्रम देहूत पार पडला. यावेळी हभप शिवाजी महाराज मोरे यांनी सुभाष पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रत्येकाने आपल्या घरातील सदस्यांच्या संख्येएवढ्या रोपांचे संगोपन केले, तरीदेखील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लागू शकेल, असे ते म्हणाले.