Duniyadari Movie | Entertaiment । ‘दिल दोस्ती दुनियादारी’ म्हणत कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच समस्त महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेला चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी’. ज्येष्ठ साहित्यिक सुहास शिरवाळकर यांच्या कादंबरीवर आधारीत व दिग्दर्शक संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड मोडले.
या चित्रपटातील श्रेयस -दिग्याची जीगरी दोस्ती, बोल्ड शिरीन आणि चॉकलेट बॉय श्रेयसची लव्ह स्टोरी, जितेंद्र जोशीने वठवलेला ‘साई’ नावाचा व्हिलन असेल किंवा श्रेयसवर प्रेम करणारी भोळी मिनू असेल आजही ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
दरम्यान, आता हे सगळं तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. कारण ‘दुनियादारी’ सिनेमाची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता अंकुश चौधरी याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय.
यात त्याने ‘दुनियादारी’ सिनेमाविषयी भाष्य केलंय. 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये… ‘दुनियादारी’, अशी पोस्ट ‘दुनियादारी’ सिनेमातील कलाकारांकडून शेअर करण्यात आली आहे. यावरून आता प्रेक्षकांनी अनेक तर्क-वितर्क लावले आहेत.
शेअर केलेल्या या पोस्टवर ‘दुनियादारी’च्या शोची वेळ लिहिण्यात आली आहे. मात्र सिनेमाची रिलीज डेट लिहिण्यात आलेली नाही. त्यामुळे सिनेमाची घोषणा जरी झाली असली तरी तो रिलीज कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या सोशल मीडियावर देखील याच सिनेमाची चर्चा रंगली आहे. नेटकरी कमेंट करत अनेक तर्क-वितर्क लावताना दिसत आहेत.
कुठल्या थिएटरमध्ये रिलीज होणार दुनियादारी?
ठाणे, भिवंडी, कांदिवली, घाटकोपर, मरिन लाइन्स, हिंजेवाडी, बंड गार्डन रोज, अकुर्डी येथील थिएटर्समध्ये दुनियादारी हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे.