मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीशी घरोबा केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. येत्या बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते यांना फोनाफोनी सुरू झाली आहे.
बैठकीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याने पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्या बैठकीस उपस्थित राहायचे तसेच कोणत्या गटाकडे जायचे, असा संभ्रम पदाधिकाऱ्यांचा झाला असून, “साहेब की दादा?’ या दोघांपैकी कोणाची निवड करायची, असा यक्ष प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
दरम्यान, शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सूत्र हलवतायत. आता उपमुख्यमंत्री अजित पवारही ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी त्यांच्यासोबत येण्यात आवाहन केलं आहे. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष त्यांचा निर्णय कळवणार आहेत.