पिंपरी – स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2022 राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहराचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाचे पथक शहरामध्ये दाखल झाले आहे. त्यांच्यामार्फत शुक्रवारपासून शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण भारत अभियानाअंतर्गत देश पातळीवर स्वच्छ सर्वेक्षण 2022 राबवले जात आहे. या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराने देखील सहभाग नोंदवला आहे. सर्वेक्षणामध्ये देशामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
या सर्वेक्षणासाठी समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सार्वजनिक शौचालये, रस्ते साफसफाई, कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापन, उद्यानांचे सुुशोभीकरण, वृक्षलगावड, रंगरंगोटी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. रहिवाशी व दुकानदारांना घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा देण्यासाठी जनजागृती केली जात आहे. शहरातील सर्व कचराकुंड्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील भटकी जनावरे आटोक्यात येण्यास मदत होत आहे.
तसेच शहरामध्ये सीमाभिंती, झाडे पदपथ उड्डाणपूल आदी स्वच्छ करून त्यावर रंगरंगोटी करण्यात येत आहे. झोपड़पट्टी जवळील स्वच्छतागृहे स्वच्छ करून त्याचे सुशोभीकरण केले जात आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने 2016 मध्ये नववा क्रमांक मिळवला होता. मात्र त्यानंतर 2017 साली शहर थेट 72 व्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतर मागील वर्षापर्यंत शहर पहिल्या दहा क्रमांकामध्ये देखील येऊ शकले नाही. सर्वेक्षणासाठी शुक्रवारी केंद्रीय पथक शहरामध्ये दाखल झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस हे पथक शहरामध्ये राहून शहरातील विविध भागात पाहणी करणार आहे.
सोशल मीडियावर जनजागृती
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहर स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण करून देणे, तसेच उद्याने, बसथांबे, सार्वजनिक कार्यालयांमध्ये स्वच्छ ठेवणे आदींसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यासाठी व्हिडिओ, ऑडिओ व विविध संदेशांचा वापर केला जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक दाखल झाले आहे. त्यांच्या पद्धतीने ते शहराच्या विविध भागामध्ये पाहणी करत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे शहरामध्ये बदल दिसत आहे. आपण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये चांगला क्रमांक मिळवू.
– राजेश पाटील, आयुक्त, पिं. चिं. महापालिका.