कार्ला, दि.24 (वार्ताहर) – श्री एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाची सुरवात आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच सोमवारी (दि.26) घटस्थापना करण्यात येणार असून महानवमीचा हा होम 4 आक्टोबरला पहाटे होणार आहे,अशी माहिती एकवीरा देवस्थान कार्ला वेहरगाव प्रशासकीय समितीच्या वतीने देण्योडत आली. यानिमित्त मुख्य मंदिर व परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने हा परिसर दिव्यांच्या उजेडात उजळून निघाला आहे.
कार्ला वेहरगाव गडावरील एकवीरा देवीच्या नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव कार्यक्रमाला घटस्थापनेच्या दिवशी सुरूवात होणार आहे. सकाळी सात ते आठ या वेळेत आई एकवीरा व आई जोगेश्वरी देवीची विधिविहत पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. आश्विन शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमीचे उपवास असून सर्वात महत्वाचा होम हवन विधी रात्री अकरा वाजता सुरू होणार असून पूर्णाहुती पहाटे पाच वाजता करून उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. दरम्यान या नऊ दिवसांच्या काळात गडावर दररोज पहाटे दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यात येणार आहे,
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी दिली. तसेच आई एकवीरादेवी मंदिर भक्तांना दर्शवण्यासाठी सज्ज झाले असून मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई तसेच भाविकांच्या दर्शन रांगेवर मंडप तथा पुष्प सजावट करण्यात आली आहे.
महत्वाच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्शन रांगांची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली आहे.भाविकांची आबाळ होऊ नये, याकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गडाच्या पार्किंगच्याठिकाणी व भक्तधाम येथे स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने गडावर बांधलेले स्वच्छतागृह मागील काही महिन्यांपासून बंद आहे. ते भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.