वडगाव मावळ, दि. 24 ( प्रतिनिधी) -जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खरी गुणवत्ता असते. त्यांना त्यांच्या पातळीवर जाऊन शिक्षक शिक्षण देतात परंतु अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा नसल्याने खाजगी शाळांच्या तुलनेत ते कमी पडतात. त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले
पंचायत समिती मावळ व मावळ विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळा पुरस्काराचे शनिवारी (दि.24)आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेळके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद होते.
येथील भेगडे लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी अधिकारी बाळासाहेब राक्षे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती ज्योती शिंदे, निकीता घोटकुले, सुवर्णा कुंभार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदु धनवे, दिपक हुलावळे विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज आदी उपस्थित होते.
यावेळी आयुष प्रसाद म्हणाले की, आजच्या समारंभात अनेक शिक्षकांना गुणवंत पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्कारामुळे प्रत्येकाची जबाबदारी वाढली असुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्याचा उपयोग करावा व आपले काम अधिक उत्तम कसे होईल, यासाठी प्रयत्न करावे. शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थी घडवणारा एकमेव स्त्रोत हा शिक्षक असून करोना काळात झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान जलदगतीने भरुन काढुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद तनपुरे व वैशाली कोयते यांनी केले. सुहास विटे यांनी आभार मानले.
120 पुरस्कारांचे वितरण
प्राथमिक शिक्षक 50, माध्यमिक विभाग 24, विशेष पुरस्कार – 6 प्रशासनातील अधिकारी- 15 व तालुक्यातील उपक्रमशील शाळा 24 असे 120 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.