पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) -पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीला आता पिंपरी गावात किंवा पुढे पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथील रेल्वे फाटकावर थांबण्याची गरज नाही. कारण, डेअरी फार्म येथील लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यास संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने उड्डाणपूल बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यासाठी स्थापत्य विभागाकडून आज निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.
डेअरी फार्म येथील रेल्वे रुळावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून आज 58 कोटी 57 लाख 30 हजार 577 रुपये खर्चाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. 24 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2022 ई-निविदा भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. 10 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम निविदा स्वीकारली जाणार आहे. तर 12 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता निविदा उघडली जाणार आहे. उल्लेखनीय बाब अशी की संरक्षण खात्याकडून परवानगी मिळविण्यासाठी स्थानिक माजी नगरसेवक संदीप वाघेरे तसेच सामाजिक संघटना व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले होते.
दोन वर्षात उड्डाणपूल तयार होणार
येत्या दोन वर्षात डेअरी फार्म येथील लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. कारण, याठिकाणी रेल्वे रुळामुळे वाहनांना कधीकधी अर्धा तास रेल्वे जाण्याची वाट पहावी लागते. दरम्यान, दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. या उड्डाणपुलामुळे डेअरी फार्म रस्त्यावर वाहतूक सुरळीत होईल.