पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुंडांच्या धमकीला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार पेठेत भीमनगर परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धार्थ विजय फडतरे ( १७, रा. शंकर मंदिरामागे, भीमनगर, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार रोमियो कांबळे ( २७) संकेत कांबळे ( २४ दोघे रा. भीमनगर, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिद्धार्थची आई अनिता ( ४०) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रोमियो आणि संकेत भीमनगर परिसरात राहायला आहेत. दोघांविरुद्ध मारामारीचे गुन्हे दाखल आहे.
गेल्या वर्षभरापासून आरोपी सिद्धार्थला जीवे मारण्याच धमकी देऊन त्याला मारहाण करत होते. प्रतिस्पर्धी टोळीतील मुलांबरोबर राहू नको, अशी धमकी आरोपींनी त्याला दिली होती. त्यांच्या मारहाणीमुळे तो घाबरला होता.
आरोपी रोमियो आणि संकेत यांनी ३० मे रोजी रात्री सिद्धार्थला मंगळवार पेठेतील नागझरी नाल्याजवळ नेले. तेथे त्याला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या मारहाणीमुळे घाबरलेल्या सिद्धार्थने आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.