पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – सुरक्षा आणि कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाला फिट असणे खूप गरजेचे आहे. परंतु अत्यल्प मनुष्यबळ, कामाच्या वेळा, अतिरिक्त ताण, कामामुळे बिघडलेले जेवण आणि झोपण्याचे वेळापत्रक या सर्व बाबींनी ज्यांना सर्वांत अधिक फिट असायला हवे त्यांच्याच फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फिटनेस चॅलेंजमध्ये 2,194 पैकी केवळ 94 पोलीस उत्तीर्ण झाले आहेत. शहरासाठी ही खूपच गंभीर बाब आहे. पोलिसांच्या फिटनेसकडे आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत सरकार आणि प्रशासनाने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी राबविलेल्या फिटनेस चॅलेंज स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (दि. 24) पार पडला. या स्पर्धेत शहर पोलीस दलातील दोन हजार 194 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातील केवळ पाच टक्के पोलीस हे फिटनेस चॅलेंज पूर्ण करू शकले आहेत. इतर दोन हजार 100 पोलिसांना हे चॅलेंज पूर्ण करता आले नाही.
पोलीस मुख्यालय निगडी येथे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. पाच टक्क्यांपेक्षा कमी पोलीस ही स्पर्धा पूर्ण करू शकले आहेत. विजयी पोलिसांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते स्मार्ट गिअर सायकल बक्षीस म्हणून देण्यात आली. सहायक आयुक्त सागर कवडे, सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखेडे, पोलीस हवालदार सुरेखा देशमुख, पोलीस अंमलदार विनायक विधाते आदी यशस्वी पोलिसांनी मनोगत व्यक्त केले.
61 दिवसांची स्पर्धा
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 26 फेब्रुवारी ते 27 एप्रिल या कालावधीत एका खासगी कंपनीच्या माध्यमातून फिटनेस चॅलेंज स्पर्धा घेण्यात आली. एक हजार किलोमीटर सायकल चालविणे, 300 किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. ही स्पर्धा 61 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले. स्पर्धेत दोन हजार 194 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातील 44 पोलिसांनी एक हजार किलोमीटर सायकल चालवली तर 50 पोलिसांनी 300 किलोमीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली.
2100 पोलीस करू शकले नाहीत स्पर्धा पूर्ण
या स्पर्धेत 2194 पोलिसांपैकी 2100 पोलिसांना ही स्पर्धा पूर्ण करता आलेली नाही. पोलिसांवरील कामाचा ताण, स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ न मिळणे, आरोग्याकडे दुर्लक्ष अशी मुख्य कारणे यामुळे समोर येत आहेत. नुकताच शहर पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याकडे देखील लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे फ्रंट वॉरिअरच्या भूमिकेत असून अहोरात्र समाजाच्या सुरक्षितता व लोकांच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांनी आपल्या स्वास्थ्याकडे अधिक लक्ष देऊन कर्तव्य बजावावे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे.- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त