‘पब्जी’च्या अतिवापराने मुलांचे भविष्य अंधारात

जगण्याचे भान हरपले : मानसिक तणावही वाढीस

– अतुल काळदाते

राजेगाव – पब्जी गेमच्या वाढत्या वापरामुळे तरुणांवर फार विपरीत परिणाम होताना दिसत आहे. सध्या प्रत्येक मोबाइलवर चोवीस तास इंटरनेट सेवा उपलब्ध झाली असून, ऑनलाइन खेळांचे पेव वाढले आहे. या ऑनलाइन जगतात तरुणाई गुरफटून गेली आहे. ब्ल्यू व्हेल, पोकेमॉन या खेळांनी गेल्या वर्षी अनेकांचे बळी घेतले. मात्र, आता पब्जी गेममुळे तरुणाई आपले जगणे विसरून गेली आहे. ग्रामीण भागातील मुलेही तासन्‌ तास सर्व काही विसरून हा गेम खेळताना दिसत आहेत.

पब्जीमधील हिंसक दृश्‍यांनी मुलांच्या वागण्या-बोलण्यात बदल होत आहे. आक्रमक स्वभावातून मुलांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. पब्जीच्या नादात मुले मैदानी खेळ विसरून गेली आहेत. रात्रभर ग्रुपने जागून हा खेळ खेळला जात आहे, त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो, गेममध्ये असलेल्या मारधाडीचं अनुकरण खऱ्या आयुष्यातही करण्याची मानसिकता मुलांमध्ये तयार होते. हा गेम खेळण्याला वयोमर्यादा असली, तरी ती पाळली जात नाही. दिवसातील बराचसा वेळ पब्जी गेममध्ये जात असेल तर एक दिवस मुलांच्या स्वभावातील दुष्परिणामांना कुणीही आवर घालू शकणार नाही. यामुळे ग्रामीण भागातील मैदानी खेळही आता हळूहळू लुप्त होतील, अशी भीती वाटू लागली आहे.

पब्जीमधील अनेक हिंसक दृश्‍यांनी मुलांच्या वागण्या-बोलण्यात बदल होताना दिसत आहेत. ते पब्जी खेळत असताना त्यांना काही बोलले तरी मुले चिडचिड करतात.
– भरत मोरे, पालक


पब्जी खेळत असताना जर कोणी मध्ये बोलले तर राग येतो आणि त्या गेममध्ये मरण्याच्या भीतीने दडपण येते, त्यामुळे मानसिक संतुलनही बिघडू शकते.
– तुषार तोरड, विद्यार्थी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.