पुणे – लष्कर परिसरातील महत्त्वपूर्ण बाजारपेठ असलेले छत्रपती शिवाजी मार्केट सुरू करावे, अशे मागणी वारंवार बोर्डाकडे केली जात होती. याची दखल घेत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने ही बाजारपेठ तात्पुरती खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 1 ते 12 जुलै या कालावधीत दररोज पहाटे 5 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकाने खुली ठेवण्यासाठी बोर्डाने सशर्त परवानगी दिली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी मंगळवारी शिवाजी मार्केट खुले करण्याबाबत आदेश काढला आहे. यानुसार, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावर राखण्यासाठी मार्केटमधील साडेपाचशे दुकानांपैकी एक तृतीयांश दुकानेच दररोज पहाटे 5 ते सायंकाळी 7 या वेळेत खुली ठेवता येणार आहे. मार्केटमध्ये सुरक्षित वावर राखण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची राहणार असून, मार्केटच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर बसविण्याची जबाबदारी मार्केट असोसिएशनची असून, मास्कशिवाय कोणत्याही ग्राहकाला प्रवेश दिला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असणार आहे.
क्लोव्हर टॉवरही उघडणार
महिला आणि तरुणींचे खरेदीसाठी आवडीचे ठिकाण म्हणजे लष्कर परिसरातील क्लोव्हर टॉवर मार्केट. ही बाजारपेठ उघडण्यासही बोर्डाने मंगळवारी परवानगी दिली असून, सम-विषम नियमाप्रमाणे सकाळी
9 ते सायंकाळी 8 यावेळेत या परिसरातील सौदर्यप्रसाधने, चपला, कपडे विक्री आणि शिलाईची दुकाने खुली ठेवण्यात येणार आहेत.