विलगीकरण कक्षात येणाऱ्यांसाठी पालिकेचे आदेश
पुणे – शहरात करोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर बाधिताच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाते. यावेळी हे नागरिक 14 दिवस त्याच ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याने महापालिकेकडून या नागरिकांना विलगीकरण कक्षात टॉयलेटरी साहित्य (टूथब्रश, टूथपेस्ट, हेअर ऑइल, कंगवा, साबण) असे साहित्य दिले जात होते. मात्र, या साहित्याची मागणी वाढल्याने विलगीकरण कक्षात आणण्यात येणाऱ्या व्यक्तींना त्यांनी हे साहित्य घरूनच आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे साहित्य पुरविताना पालिकेची दमछाक होत असून ते उपलब्ध होण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेकडून शहरात संस्थात्मक विलीनीकरणासाठी सुमारे 12 हजार बेडची तयारी करण्यात आली आहे. तर रुग्णांच्या संपर्कात आलेले तसेच कंटेन्मेंट झोनमधील संशयित असे सुमारे तीन हजारांहून अधिक जणांना महापालिकेने संस्थात्मक विलगीकरण केले आहे.
शहरात करोना संशयित रुग्ण सापडण्यास सुरूवात झाल्यानंतर तसेच परदेशातून आलेले नागरिक होम क्वारंटाइनमध्ये बाहेर पडून संसर्ग पसरण्याची भीती असल्याने पालिकेने सुरूवातीला या विलगीकरण कक्षात हे टॉयलेटरी साहित्य उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे परदेशातून आलेले नागरिक त्या ठिकाणी विलगीकरणास तयार झाले. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या भागातील संशयित रुग्णाच्या संपर्कातील सर्वांनाच संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे हे साहित्य आता कमी पडू लागले आहे.
शिवाय त्यावर पालिकेचा खर्च वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने अखेर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देत ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विलगीकरण कक्ष आहेत, त्या क्षेत्रीय कार्यालयांनी संस्थात्मक विलगीकरण करणाऱ्यासाठी व्यक्तींना घेऊन जातानाच त्यांना आपले स्वत:चे साहित्य घेऊन येण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेशात म्हटले आहे.